
सावंतवाडी : कोकणातील प्रिंट, टीव्ही तसेच डिजिटल माध्यमात यशस्वी वाटचाल करत असलेल्या "कोकणसाद" या माध्यम समूहाने आपल्या कामकाजाचा विस्तार करत नवीन विस्तारीत कार्यालयातून कार्यारंभ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या कार्यालयाचा शुभारंभ रविवारी अक्षय तृतीया या अत्यंत शुभ दिनी, १९ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सावंतवाडी येथील हरिप्रिया अपार्टमेंट, एस.टी. बसस्थानकाजवळ कोकणसाद माध्यम समुहाच्या प्रधान कार्यालय कार्यरत आहे. १ मार्च २६ रोजी कोकणसाद LIVE ने १२ वर्षांची माध्यम समूहातील कोकणात यशस्वी वाटचाल पुर्ण केल्यानंतर रविवार पासून दैनिक कोकणसाद च्या प्रिंट विभागाचे कामकाज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर नव्या विस्तारित कार्यालयातून शुभारंभ करण्यात येत आहे. प्रधान कार्यालयाच्या वरील मजल्यावर या विस्तारित कार्यालयाची सुरवात होतं आहे. त्यामुळे कोकणसादच्या प्रिंट, टीव्ही तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामकाज अधिक व्यापक आणि प्रभावीपणे आणि तितक्याच गतिमानतेने पुढे जाणार आहे.
गेल्या १२ वर्षांत कोकणसादने कोकणसाद LIVE आणि दैनिक कोकणसाद च्या माध्यमातून कोकणातील घडामोडींना न्याय देत समाजातील विविध प्रश्न, स्थानिक घडामोडी, सांस्कृतिक उपक्रम आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने प्रकाश टाकला आहे. शिवाय वेळोवेळी थेट ग्राउंडवर उतरून टीम कोकणसाद कोकणवासियांचा हक्काचा आवाज बनली आहे. याच लाल मातीतील तमाम कोकणी जनतेच्या विश्वासाच्या जोरावर कोकणवासीयांचा ठाम आवाज बनत पुढील वाटचाल अधिक जोमाने करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे. या प्रवासात वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, वितरक तसेच सदिच्छादूत यांच मिळालेलं प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद हीच 'कोकणसाद'ची खरी ताकद असल्याचे मत टीम कोकणसाद ने व्यक्त केले आहे. या पाठबळामुळेच कोकणसादने आपल्या माध्यम सेवेचा विस्तार करत नवीन उंची गाठण्याचा संकल्प केला आहे.
या सोहळ्यामुळे कोकणसादच्या वाटचालीत एक नवा टप्पा सुरू होणार आहे. भविष्यात अधिक दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देत कोकणवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प टीम कोकणसादने पुन्हा अधोरेखित केला आहे. या विस्तारित नवीन कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त कार्यालयात श्री सत्यनारायण महापुजेचं आयोजन करण्यात आलं असून मान्यवर, वाचक, दर्शक, हितचिंतक साऱ्यांच्याच शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर व संपादक संदीप देसाई यांनी व्यक्त केलायं.









