
सावंतवाडी : तालुक्यातील वेर्ले-सटवाडी रस्त्यावर उभारण्यात आलेली मोरी पूर्ण होताच एका बाजूने खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेर्ले मुख्य रस्ता ते सटवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर मोरी बांधण्याचे काम जनसुविधा सत्त २०२५-२६ योजनेतून हाती घेण्यात आले होते. या कामासाठी अंदाजे ४ लाख ९९ हजार ८६३ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कार्यारंभ आदेश १० डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता, तर काम पूर्ण करण्याची मुदत २९ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली होती.
हे काम ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या नावावरून करण्यात आले असून कार्यान्वयनाची जबाबदारी जि.प. बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्याकडे होती. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण होताच मोरीच्या एका बाजूने खचल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कदम यांनी थेट आरोप करत सांगितले की, हे बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित यंत्रणेने डोळेझाक केली आहे. सार्वजनिक पैशांचा हा उघड उघड अपव्यय आहे. कदम यांनी पुढे मागणी करत स्पष्ट केले की, या प्रकरणाची क्वालिटी कंट्रोल मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई व्हावी व संबंधित कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये. एकीकडे, शासन विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे अशा निकृष्ट कामांमुळे जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे. वेर्ले-सटवाडी येथील मोरीप्रकरणी आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










