
मालवण : मालवणहून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार युवकाचा भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास चौके येथे घडली. चौके नांदरुख येथील रहिवासी चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०) हा युवक नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी (MH07 AD 1633) वरून मेव्हण्यासह कामावरून घरी परतत होता. घराजवळच असताना चौके येथे (MH07 X 0666) क्रमांकाच्या डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकी डंपरला अडकली. यात चव्हाण हे डंपरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सोबत असलेल्या नातेवाईकास किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच चौके ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृत चंद्रकांत चव्हाण हे सेंट्रींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरू केली आहे. या वेळी राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे व सचिन आंबेरकर यांनी मदतकार्य केले.











