
मालवण : राजा कर्नगिरी स्वामी महाराज यांच्याशी संबंधित असलेल्या शिवकालीन शिवपिंडीबाबतचे वृत्त कोकणसाद लाईव्हने प्रसारित करताच मालवणकरांच्या भावना पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत. या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूचे जतन व्हावे, यासाठी आता मालवणकर एकवटले असून जनजागृतीला वेग आला आहे. उद्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्या ठिकाणी लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण मेढा येथील राजा कर्नगिरी स्वामी महाराज यांच्या शिवकालीन घुमटी आणि समाधीवर शिवपिंडी असल्याचे वृत्त कोकणच नंबर 1 चॅनेल कोकणसाद लाईव्हने समोर आणले होते. कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरातील शिवपिंडी आणि मेढा येथील या घुमटीतील शिवपिंडी एकसारखी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यापूर्वीच या ठिकाणी घुमटी बांधण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
सध्या स्थानिक नागरिक कुलदीपक उर्फ बाळा जनार्दन मुळेकर व त्यांचे कुटुंबीय येथे नियमित पूजा-अर्चा करत आहेत. या घुमटी व शिवपिंडीला ऐतिहासिक तसेच धार्मिक दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, कालांतराने या ठिकाणाकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नव्हते. या पार्श्वभूमीवर जतनाची गरज अधोरेखित करणारे वृत्त कोकणसाद लाईव्हने प्रसारित करताच नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. फेसबुक, व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडियावरून नागरिकांनी या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करत जतनासाठी आवाज उठवला आहे. “ही केवळ श्रद्धेची जागा नसून मालवणच्या इतिहासाची साक्ष देणारी वास्तू आहे. त्यामुळे तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या ठिकाणाची स्वच्छता, देखभाल व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच या शिवकालीन वास्तूचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनीही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
मालवणमध्ये अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे असून त्यांचे जतन व संवर्धन झाल्यास सांस्कृतिक वारसा जपला जाईलच, शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘शिव कर्नगिरी महाराज’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून मोठ्या संख्येने शिवप्रेमी त्यामध्ये सहभागी होत आहेत.
दरम्यान, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने उद्या शिवकालीन घुमटी येथे लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर सुश्राव्य भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजन भोजणे यांनी केले आहे.










