चालकाच्या निष्काळजीपणामुळे चिमुरडीवर काळाचा घाला

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 12, 2026 19:06 PM
views 341  views

सावंतवाडी : आंबोली घाटात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ११ वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील आणि बहीण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद गोविंद राऊत हे आपल्या कुटुंबासह सुझुकी ॲक्सेस (क्र. MH 07 AU 6928) वरून आंबोलीकडून दानोळीच्या दिशेने जात होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी नानापाणी परिसरातील एका वळणावर आली असता, मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. GJ 03 BW 9027) त्यांना जोरदार धडक दिली.

या ट्रकमध्ये फरशा (टाईल्स) आणि मार्बलचा जड माल भरलेला होता. ट्रक चालक प्रकाश बिजलबाई टोयटा (वय २६, रा. राजकोट, गुजरात) याने वळणावर गाडीचा वेग कमी न करता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडला. या भीषण धडकेत कुमारी निकिता प्रसाद राऊत (वय ११) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची आई सुचिता राऊत, वडील प्रसाद राऊत आणि सहा वर्षांची बहीण निधी राऊत हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतरही ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की, चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका वळणावर हा ट्रक बाजूच्या दगडावर आदळून पलटी झाला. यामध्ये चालक प्रकाश टोयटा आणि क्लिनर विशाल टोयटा हे दोघेही जखमी झाले असून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास कदम, मुंडे, होमगार्ड भांडे आणि जंगले यांनी तातडीने मदतकार्य राबवून घाटातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. आरोपी ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत निकिता हिचे शवविच्छेदन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण करत आहेत.