वादाऐवजी संवादाचा मार्ग अवलंबा : उद्योजक अवधूत तिंबलो

उद्योजक अवधूत तिंबलो यांचे लॉच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; महाविद्यालयाच्यावतीनं उद्योजक तिंबलो यांचा विशेष सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: April 12, 2026 22:11 PM
views 28  views

कुडाळ : येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या वतीने गोवा व महाराष्ट्रातील प्रख्यात उद्योजक  अवधूत तिंबलो यांचा नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे संस्थापक  व्हिक्टर डांटस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन श्री. तिंबलो यांना गौरविण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर श्याम वडेर, महाविद्यालयाचे सल्लागार मलुष्टे, महाविद्यालयाच्या प्राचार्या, ‘कोकणसाद’चे संपादक-संचालक संजय ढवळीकर, फोमेंतो समूहाचे सदानंद देसाई तसेच आनंद परुळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचीही मोठी उपस्थिती लाभली.

सत्काराला उत्तर देताना अवधूत तिंबलो यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कायद्याचे शिक्षण घेत असताना केवळ खटलेबाजीवर भर न देता समाजातील वाद, तंटे आणि मतभेद हे मध्यस्थी, संवाद व तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यामुळे समाजात सौहार्द टिकून राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा एक नवा दृष्टिकोन मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.