
दोडामार्ग : आंबडगावातील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरी पुलावरील भिंती आणि रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत सरपंच स्नेहा गवस यांनी व्यक्त केली.
नुकतेच काम पूर्ण झालेल्या पुलाच्या भिंती आणि रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे या ठिकाणी कधीही अपघात होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा निष्काळजीपणा नेमका विभागाचा आहे की संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे स्नेहा गवस यांनी स्पष्ट केले. पुलावरील भिंती आणि रस्त्याचे दुरुस्ती काम तात्काळ हाती घेऊन पूर्ण करण्यात यावे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाढीव निधी आल्या नंतर काम पूर्ण करू :- सीमा गोवेकर सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्त्याच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. लगतच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर नाही आहे. त्या रात्याच्या कामाला निधी वाढीव मिळण्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केलेला आहे. निधी मंजूर झाल्यावर लगेच कामाला सुरवात करणार असल्याचे बांधकाम विभाग च्या अभियंत्या सीमा गोवेकर यांनी सांगितले










