
दोडामार्ग : दोडामार्ग - विजघर या राज्यमार्गाच्या नूतनिकरण व काँक्रीटीकरणाच्या कामावरून आधीच पेटलेल्या वातावरणात आता ‘गुप्त बैठकी’नंतर नव्या वादाची भर पडली आहे. तहसीलदारांच्या दालनात झालेल्या या बैठकीत रस्त्याच्या कामाशी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना देत संबंधित ठेकेदारांना काम सोमवारपर्यंत तत्काळ बंद करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले होते. मात्र, या आदेशालाच ठेकेदारांनी उघडपणे केराची टोपली दाखवल्याने प्रशासनाचीच प्रतिमा धुळीस मिळाल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम करत असताना सर्व नियम पायदळी तुडवत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यासोबत एक बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी एक बैठकही पार पडली. मात्र यावेळी फक्त सत्ताधारी, संबंधित दोन ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकारी यांची गुप्त बैठक तहसीलदार यांच्या दालनात पार पडली. या बैठकीचे तीव्र पडसाद तालुकाभर उमटू लागले. या बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने सात दिवस काम बंद करून सोमवारी पुन्हा बैठक लावण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मात्र तहसीलदारांच्या सूचनेनंतर केवळ दोन दिवस काम बंद ठेवण्यात आले आणि तिसऱ्याच दिवशी तिलारी ते विजघर या मार्गावर काम करणाऱ्या ठेकेदाराने पुन्हा जोरात काम सुरू केले.
विशेष म्हणजे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिलारी ते दोडामार्ग या दुसऱ्या ठेकेदारानेही कामाला सुरुवात केली. त्यामुळे ‘सूचना देणारे प्रशासन’ आणि ‘त्या धुडकावणारे ठेकेदार’ असा प्रकार उघडपणे समोर आला आहे. काम पुन्हा सुरू झाल्याची माहिती सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तिलारी-विजघर मार्गावरील ठेकेदाराला जाब विचारला. मात्र, यावेळी प्रकरण चांगलेच चिघळले. संबंधित ठेकेदाराने थेट दांडगाईचा वापर करत उलट पदाधिकाऱ्यांनाच दमदाटी करू लागला. मात्र सत्ताधारी पक्षातील त्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ठेकेदार स्वतः पोटठेकेदार असून सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारी असल्याने ‘सत्ताधाऱ्यांमध्येच भिडंत’ झाल्याचे चित्र निर्माण झाले.
या वादावेळी “प्रशासनाचे जर तुम्ही ऐकत नसून सर्वसामान्यांना वेठीस धरणार असाल तर तुमची तक्रार थेट पालकमंत्र्यांकडे करणार” असा इशारा देण्यात आला. मात्र त्यालाही न जुमानता “मी माझं काय ते बघून घेतो” असे उर्मट उत्तर देत संबंधित ठेकेदाराने काम सुरूच ठेवले. या प्रकारामुळे प्रशासनाला उघडपणे आव्हान दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात तहसीलदारांच्या स्पष्ट सूचनांनंतरही ठेकेदार काम सुरू करतात म्हणजे प्रशासनाचे आदेश पाळले जात नाहीत की या सर्वामागे ‘अळीमिळी गुपचिळी’ आहे? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.
आधीच निकृष्ट दर्जाचे काम, वाढते अपघात आणि जिवितहानीच्या घटनांमुळे संतापलेल्या जनतेमध्ये या नव्या प्रकारामुळे आणखी संताप उसळला आहे. पालकमंत्र्यांचे नाव घेऊनही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या ठेकेदारांवर नेमकी काय कारवाई होते? की पुन्हा एकदा प्रकरण दाबून टाकले जाते? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










