
सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या संकल्पनेतून आगामी ४ मे रोजी गोवा येथील पणजी शहरात असलेल्या आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कला अकादमी येथे दिमाखात संपन्न होणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच गोवा राज्यातील तमाम महानुभव आणि त्यांचे विविध खात्यातील मंत्री तसेच केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही पत्रकारितेच्या क्षेत्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच त्यांच्या समस्या आणि समस्यांची जाणीव उपाय योजना या सारख्या गंभीर विषयांवर या अधिवेशनात विचार मंथन केले जाणार आहे. म्हणून महाराष्ट्रसह देशभरातील हजारो पत्रकार या राष्ट्रीय अधिवेशनात सहभाग नोंदविणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे संघटक सिताराम गावडे यांनी दिली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हा संघटक आनंद धोंड, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत यांसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पुढे बोलताना सिताराम गावडे म्हणाले की, आतापर्यंत पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अनेक संघटना आपापल्या पद्धतीने न्यायासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, देशभरातील सर्व पत्रकारांसाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही यांपेक्षा वेगळा स्तरावर काम करत आहे. याचा अनुभव मागील काही वर्षात आपण स्वतः घेतला असून त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सावंतवाडी तालुक्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानात काम करणारे आणि डिजिटल युगातील अत्यंत अभ्यासू व युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी सिद्धेश पुरलकर, उपाध्यक्षपदी विशाल पित्रे, संघटक पदी प्रशांत मोरजकर तर खजिनदारपदी भिकाजी उर्फ नाना धोंड, प्रसिद्धी प्रमुख म्हणून साबाजी परब यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी त्रिविक्रम सावंत तर सदस्य पदी युवा पत्रकार शुभम सावंत, श्रीरंग सावंत, संदीप राऊळ, आशिष धोंड, धनराज सगम यांसह अन्य डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधवांची निवड करण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी व आभार प्रदर्शन आनंद धोंड यांनी केले.











