
सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 'डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक' स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी विश्वास पाटील हिने सुवर्णपदक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, आर.पी.डी. प्रशालेने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या जान्हवीने या स्पर्धेसाठी 'अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या कार्यक्षमतांचे मूल्यांकन' या विषयावर आधारित कृती संशोधन प्रकल्प सादर केला होता. कुजलेल्या अवशेषांतून निळ्या ज्योतीकडे: बायोगॅस कार्यक्षमतेच्या नव्या वाटेचा वैज्ञानिक प्रवास" या शीर्षकाचा तिचा हा प्रकल्प परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील यशानंतर तिची निवड 'VIVA' (तोंडी) परीक्षेसाठी झाली होती, जिथे तिने आपल्या कौशल्याने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. गतवर्षी कु. योगेश जोशी याने सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर लगेचच जान्हवीने ही कामगिरी केल्यामुळे प्रशालेने सलग दोन वर्षे सुवर्णपदक जिंकण्याचे यश साध्य केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक आणि शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी जान्हवीचे अभिनंदन केले.
तसेच मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे, तिचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालक-शिक्षक संघाने जान्हवीच्या या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










