कंत्राटी कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही : जयेंद्र रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 05, 2026 19:55 PM
views 56  views

वैभववाडी : तालुक्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत. एकाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,कंपनीने कर्मचारी कपात केल्यास पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल असा  इशारा जयेंद्र रावराणे यांनी दिला. महावितरण कंपनीकडून १ एप्रिलपासून कंत्राटी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आज कंत्राटी कामगारांची बैठक वैभववाडी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत, जयेंद्र रावराणे, केंद्रीय कार्यकारिणी सचिव आनंद लाड, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर तसेच ठेकेदार समाधान चव्हाण ,दिनेश तांबे, अजीम ठाणगे व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते 

यावेळी श्री.रावराणे म्हणाले की, “कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. काम करताना ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक आहे. कामाचे स्वरूप जोखमीचे असल्याने कामगारांनी शांतपणे व जबाबदारीने काम करावे.” भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी कामगारांना एकजुटीचे आवाहन करताना “संघटनेसाठी कामगारांचे हित सर्वप्रथम आहे. एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवून कामगार हित जपले पाहिजे,” असे सांगितले. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.