
कणकवली : कणकवली शहरातील मेडिकल, हॉटेल वगैरे मिळून तब्बल दहा दुकाने चोरट्यांनी फोडल्यानंतर 24 तास उलटत नाहीत तोच सावंतवाडी शहरातील देखील सहा दुकाने चोरट्यांनी फोडल्यानंतर पोलीस प्रशासनही 'अलर्ट' झाले आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही तपासामध्ये कणकवली आणि सावंतवाडी येथे दुकाने फोडणारी टोळी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही टोळी परप्रांतीय असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत असून त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पथके चोरट्याच्या शोधार्थ रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.
कणकवली शहरातील कणकवली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सना कॉम्प्लेक्ससह आणखी एका कॉम्प्लेक्समधील व अन्य मिळून जवळपास दहा दुकाने चोरट्यांनी फोडल्याची बाब शनिवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली होती. यामध्ये मेडिकल, जनरल स्टोअर्स, हॉटेल आदी दुकानांचा समावेश होता. सर्व ठिकाणी मिळून जवळपास 30 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले होते. कणकवलीत दोन दुकानांमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. दोन चोरटे दिसून आले असून दोघांचेही चेहरे सीसीटीव्ही स्पष्ट दिसत आहेत. तर या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच सावंतवाडी शहरातील सहा दुकाने चोरट्यांनी फोडल्याची बाब रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे तेथेही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पॉलिसी निरीक्षणा नुसार विशेष कणकवली आणि सावंतवाडी या दोन्ही ठिकाणची दुकाने फोडणारी टोळी एकच असल्याची बाबही दिसून आली आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही 'अलर्ट मोड'वर आले आहे. कणकवली व सावंतवाडी पोलिसांसह खासकरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात वेगवेगळ्या मार्गाने तपास मोहीम राबवली. त्यानुसार काही सुगावे हाती लागले असून एलसीबीचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. हे पथक नेमके कोणत्या दिशेने गेले, याविषयीची माहिती देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे. मात्र कणकवली आणि सावंतवाडीतील दुकाने फोडणारी टोळी लवकरच जेरबंद होईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.










