पाण्याची समस्या असताना नगरसेवक फोटोसेशनमध्ये व्यस्त : ॲड. राजू कासकर

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 29, 2026 15:29 PM
views 41  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण योग्य प्रमाणात भरलेले असतानाही शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा का लागत आहे..? असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी केला आहे. तसेच काही नगरसेवक केवळ पाहणी व फोटोसेशनमध्ये व्यस्त असल्याचा टोला देखील  कासकर यांनी हाणला आहे 

शहरात गॅस पाइपलाईन व पाण्याच्या पाइपलाईनसाठी सुरू असलेल्या खोदकामांमध्ये प्रशासन गुंतलेले दिसत असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.  ठेकेदारांकडून सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व पाण्याच्या पाईपलाईन कामांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांना रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. याबाबत ॲड. कासकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन व सत्ताधारी-विरोधकांवर निशाणा साधला आहे.

सभागृहातील आरोप-प्रत्यारोप सोडून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सावंतवाडी शहरातील अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवत असून, धरण भरलेले असतानाही योग्य नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच काही नगरसेवक केवळ पाहणी व फोटोसेशनमध्ये व्यस्त असल्याचा टोला देखील कासकर यांनी लगावला आहे.नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.