प्रदीप केळुसकर यांच्या गाजलेल्या कथांचं कथाकथन

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 29, 2026 15:13 PM
views 14  views

सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिर येथे प्रसिद्ध कथालेखक प्रदीप केळुसकर यांच्या गाजलेल्या कथांचा कथाकथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित होते. प्रदीप केळुसकर हे काळाबरोबर चालणारे लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनात दैनंदिन जगण्यातील प्रसंग, संवाद आणि घटनांचा अत्यंत कल्पकतेने वापर केला आहे. भविष्यात त्यांनी कादंबरी लेखनाकडे पाऊल वळवल्यास मराठी साहित्याला एक उत्तम कादंबरीकार मिळू शकतो असे उद्गार प्रा. बांदेकर यांनी काढले. कथाकथन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

श्रीराम वाचन मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कथा लेखक प्रदीप केळुसकर म्हणाले, मी जन्मापासून लेखक नाही. मात्र, मला साहित्याची आणि नाट्यक्षेत्राची ओढ होती. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये घरात बसून असताना योगायोगाने लेखनाला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि पाच वर्षांत १४३ कथा लिहिल्या गेल्या. आजच्या काळात कवितांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, कथाकथन हा पु. ल. देशपांडे, व.पु. काळे, द.मा. मिराजदार, शंकर पाटील यांसारख्या दिग्गजांनी गाजवलेला प्रकार मागे पडत चालला आहे. त्याला पुन्हा उभारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात श्री. केळुसकर यांनी त्यांच्या 'माणिकमोती', 'सांजतारा' आणि 'एकापेक्षा एक' या कथासंग्रहातील 'विठाई' व 'सह्यकडे' यांसारख्या कथांचे सादरीकरण केले. त्यांच्या शैलीदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ. जी.ए. बुवा, वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, मालवणी कवी दादा मडकईकर, रामदास पारकर, दत्तप्रसाद गोठसकर, वंदना करंबेळकर, मुकुंद वझे, दीपक पटेकर, भरत गावडे, मधुकर मातोंडकर, वैभव पारकर, प्रसाद वर्णे यांच्यासह सावंतवाडीतील बहुसंख्य साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.