
देवगड : देवगड तालुका कृषी विभागाच्यावतीने जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके २०२५-२६ कार्यक्रमातंर्गत कृषी महोत्सव २०२६ चे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन सभापती गणेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राणे म्हणाले शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे,अशा पद्धतीने प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयातून एकत्रितपणे शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला पाहिजे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅङ अजित गोगटे उपस्थित होते.व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, जि. प. सदस्य देवदत्त कदम, सुनील पारकर, सावी लोके,पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी,संजना लाड, शीतल तावडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष किंजवडेकर, उषःकला केळुसकर, शरद ठुकरूल, प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र वेंगुर्लेचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, रामेश्वर फळसंशोधन उपकेंद्राचे संशोधक डॉ. अजय मुंज, यशवंत गव्हाणे, उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, पं. स. कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कृषी अधिकारी मानसी पवार, उपकृषी अधिकारी संभाजी जाधव, अमृत सागर, बापुसाहेब लांबडे आदी उपस्थित होते.
शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांसाठी पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प - शासनाने एकत्रितपणे काम केले पाहिजे. गावातील ग्रामसभांमध्ये कृषी सहाय्यकांनी जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत यावेळी देवगड पं. स. सभापती गणेश राणे यांनी बोलताना व्यक्त केले.यावेळी या कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कृषी अवजारे व धान्य बियाणे प्रदर्शन, पाककला, रांगोळी प्रदर्शन तसेच विविध खाद्यपदार्थ स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
अॅड. गोगटे म्हणाले, कृषी महोत्सवातील प्रदर्शन पाहता येथील कृषी क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होताना दिसत आहे. पारंपरिक बियाणे लोप पावत चालली आहेत. मात्र, या प्रदर्शनात बियाणे दिसून आली आहेत. देशातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यात मसाले पदार्थांचे पिक घेतले जात आहे. तशाप्रकारे आपल्या किनारीभागात मसाले पदार्थ पिकावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. बचतगटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनाला मार्केटींग मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. तशाप्रकारचे मार्केटींग आता बचतगटांनी स्वतः पुढे येऊन करावे असे सांगितले. यावेळी डॉ. वैभव शिंदे, उमाकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शेतीमधील परंपरागत तंत्रज्ञान व आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. सामूहिक शेतीकडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक गावात गटाची निर्मिती करून शेती केली पाहीजे. शासनाने नवीन योजना केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला मोफत काजूची झाडे दिली जाणार आहेत. तसेच नारळाची झाडेही उपलब्ध करण्यात आली आहेत. याची लागवड जास्तीत जास्त करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी देवेंद्र तुकाराम नारकर (विठ्ठलादेवी) रंजना रमेश कदम (इळये) यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले.तर स्वागत उमाकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदीप कदम यांनी मानले.यावेळी सन २०२४-२५ मधील तालुकास्तरीय भातपिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मंगेश महादेव वारीक-पडेल, द्वितीय क्रमांक लक्ष्मण शंकर राऊत-कोटकामते, तृतीय क्रमांक दत्ताराम रावजी भाटकर-बागतळवडे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.










