कोल्हापूरमध्ये ‘सिद्धगिरी कारागीर महोत्सव’चे आयोजन

देशभरातील कलाकारांना व्यासपीठ | परंपरागत कला, हस्तकला आणि ग्रामीण उद्योगांना चालना देणारा उपक्रम
Edited by: संदीप देसाई
Published on: March 29, 2026 13:31 PM
views 16  views

कोल्हापूर :  श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे व्यवस्थापन पुण्यातील ‘एक्सक्लूसिव्ह इव्हेंट्स’ संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या महोत्सवात पारंपरिक कला, हस्तकला आणि स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. बदलत्या काळानुसार लोकांच्या आवडीनिवडीनुसार विविध प्रकारच्या कलाकृती आणि हस्तकला वस्तू येथे पाहायला मिळतील. राज्याबरोबरच देशभरातील कलाकारांनी साकारलेल्या आकर्षक वस्तूंची विक्रीही येथे होणार असून, या माध्यमातून कलाकारांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

महोत्सवात सुमारे १७ राज्यांतील कलाकार सहभागी होत असून, २०० हून अधिक कारागीर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करणार आहेत. या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये टेराकोटा, मातीची भांडी, हस्तनिर्मित दागिने, मातीच्या मूर्ती, बांबू काम, लेदर वर्क, विविध राज्यांतील पारंपरिक पेहराव, पिंजरी पेंटिंग, आदिवासी चित्रकला, हातमाग वस्त्र, मधुबनी पेंटिंग, लाख काम, मकराना मार्बल, बनारसी साड्या, हस्तकलेच्या विविध वस्तू यांचा समावेश आहे.

तसेच तंत्र महाविद्यालये, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींनाही या महोत्सवाचा लाभ होणार आहे. त्यांना पारंपरिक कला आणि उद्योगांची माहिती मिळून स्वतःचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. ‘सिद्धगिरी कारागीर महोत्सव’ हा केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.