
कुडाळ : कुडाळमधील एम.आय.डी.सी. परिसर, वरची कुंभारवाडी आणि ओमकार नगर या भागातील अंधाराचे साम्राज्य अखेर दूर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील रस्त्यांवर पथदिवे नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येची दखल घेत नगरसेवक मंदार शिरसाट यांनी स्वखर्चातून या तिन्ही ठिकाणी सोलर हायमास्ट आणि पथदिवे बसवून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कुडाळ एम.आय.डी.सी. क्षेत्रातील काणेकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता, वरची कुंभारवाडीतील अंतर्गत रस्ता आणि ओमकार नगर येथील रस्ता या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रचंड काळोख असायचा. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या कामगारांना ये-जा करताना मोठी अडचण होती. सुरक्षेच्या दृष्टीनेही येथे प्रकाश असणे अत्यंत गरजेचे होते.
येथील रहिवाशांनी या समस्येबाबत नगरसेवक मंदार शिरसाट यांची भेट घेऊन तक्रार मांडली होती. प्रशासकीय प्रक्रियेची वाट न पाहता, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदार शिरसाट यांनी स्वखर्चाने या महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सोलर लाईट बसवण्याचे काम पूर्ण केले.
सोलर दिव्यांच्या लोकार्पण प्रसंगी ओमकार नगर, वरची कुंभारवाडी आणि एम.आय.डी.सी. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी त्यांच्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










