
सिंधुदुर्गनगरी : आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाबद्दलचे अज्ञान आणि अनास्था हा वारसा संवर्धनातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे प्रतिपादन कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी येथे केले. ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तेराव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. दत्तराज सोसायटीच्या सभागृहात श्री. लळीत यांनी ‘गूढ कातळशिल्पांचे’ या विषयावर सादरीकरण केले. प्रोजेक्टरवर विविध कातळशिल्पांची छायाचित्रे आणि माहिती त्यांनी सादर केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात त्यांनी पुरातत्वशास्त्र, मानवी उत्क्रांती, प्रागैतिहासिक काळ याची ओळख करून दिली. अश्मयुगीन मानवाच्या कलेचा प्रथम आविष्कार असलेली शैलचित्रे किंवा गुहाचित्रे आणि पाषाणकला (रॉक आर्ट) याची शास्त्रीय माहिती दिली.
जगाच्या विविध भागातील पाषाणकलेचा आढावा घेतल्यावर त्यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील कातळशिल्पांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे, कुडोपी, खोटले यासह अनेक ठिकाणच्या कातळशिल्पांची माहिती दिली. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत समावेश केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी आणि गोव्यातील पॉन्साइमळ येथील कातळशिल्पांची वैशिष्ट्ये त्यांनी स्पष्ट केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रागैतिहासिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, जैवविविधता विषयक वारसा अतिशय समृद्ध आहे, असे सांगून ते म्हणाले की, मात्र या वारशाबाबत पुरेशी जागृती नाही. अज्ञान आणि अनास्था यामुळे अनेक वारसास्थळे धोक्यात आली आहेत. चिरेखाणींमुळे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. कोकणी वास्तुस्थापत्याचा आविष्कार असलेली वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिरे पाडून सिमेंट काँक्रीटची अवाढव्य आधुनिक मंदिरे उभारली जात आहेत. लोककलाही मूळ स्वरुपात सादर न करता त्यात अनावश्यक बदल केले जात आहेत. वारसा आहे त्या स्वरूपात टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासनानेही याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत श्री. लळीत यांनी व्यक्त केले.
व्यासपीठाच्या सहसमन्वयक डॉ. सई लळीत यांनी प्रास्ताविक केले. श्री. मनोहर सरमळकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. श्री. पुरुषोत्तम लाडू कदम यांनी आभार मानले. यावेळी स्टेट बँकेच्या शाखाधिकारी गौतमी महाजन, ग्राहक मंचाचे सदस्य विष्णुप्रसाद दळवी, निखिल नेरकर, मारी फर्नांडिस (मालवण), नारायण परब, महेंद्र परब (हिवाळे) आदी उपस्थित होते. सिमरन वाळके यांनी व्यवस्थापन पाहिले.










