
सावंतवाडी : कॅप्टन अशोक खरात यांना झालेल्या अटकेनंतर त्यांचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांनी एक व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खरात यांच्यावर झालेल्या आरोपांचा निषेध करतानाच केवळ ओळखीमुळे फोटोंचा विपर्यास करणे चुकीचे असल्याचे आ. केसरकर यांनी म्हटले आहे. व्हायरल झालेला एक फोटो हा ईशानेश्वर मंदिरासंदर्भातील असल्याचा खुलासा श्री. केसरकरांनी केला आहे.
ते म्हणाले, मंदिराच्या रस्त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला खरात आला होता त्यावेळचा आहे. दुसरा फोटो खरात यांच्या मुलीच्या लग्नातील असून ओळखीच्या नात्याने आपण तिथे शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. खरात यांच्यावर असलेले आरोप घृणास्पद असून आपण त्याचा निषेध करतो असे सांगून या प्रकरणाची चौकशी न्यायालय करेलच, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांनी शेवटी विनंती केली की, केवळ राजकीय वैमनस्यातून कोणाचेही जुने फोटो प्रसिद्ध करून गैरसमज पसरवू नयेत. खरात आणि आपली ओळख सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिरामुळे झाली होती. तसेच खरात यांचा खगोलशास्त्र विषयातील अभ्यास असल्याने अनेक लोक त्यांना ओळखत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केलेले आरोपही आ. केसरकर यांनी फेटाळून लावले आहेत. खरात माझे डिपार्टमेंट चालवत होते हे धादांत खोटे आहे, ते एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.










