
सावंतवाडी : आर्ट्स, टुरिझम अॅण्ड कल्चर फेस्टिव्हल समिती, गोवा तसेच श्री नागेश महारुद्र फाउंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकगौरव सन्मान परिषदेत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील दशावतार कलाकार रमेश अंकुश शिरोडकर यांना राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा गौरव सोहळा काल (रविवार२२ मार्च रोजी) गोव्यातील कला व संस्कृती भवन (सेंट्रल लायब्ररी) येथे पार पडला. कला, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी तसेच समाजहितासाठी केलेल्या निष्ठावंत, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन रमेश शिरोडकर यांना मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. शिरोडकर यांनी आपल्या दशावतार कलेची सुरुवात सुयोग दशावतार नाट्यमंडळ, मळगाव तेलकाटावाडी या स्थानिक मंडळातून केली. या मंडळातर्फे सादर झालेल्या कांचनगंगा या पहिल्याच नाटकात त्यांनी राणी लक्ष्मी व गंगा या दोन भूमिका प्रभावीपणे साकारत रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी वोर्डेकर दशावतार नाट्यमंडळ, बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (नेरूर), मामा मोचेमडकर दशावतार नाट्यमंडळ, खानोलकर दशावतार नाट्यमंडळ (खानोली), महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ (माणगाव), ओमकार नटेश्वर नाट्यमंडळ (कालेली), जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ तसेच वालावलकर आदी नामवंत दशावतार नाट्यमंडळांतून विविध स्त्री भूमिका साकारल्या. काही प्रसंगी त्यांनी पुरुष भूमिका देखील यशस्वीपणे निभावल्या आहेत.
पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना शिरोडकर म्हणाले, “दशावतार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याची पुरस्काराच्या रूपाने पोचपावती मिळाल्याचा आनंद आहे. हा सन्मान पुढील काळात ही कला अधिक जोमाने जोपासण्यासाठी मोठे प्रोत्साहन देणारा आहे.”
ते पुढे म्हणाले, “दशावतार कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही ज्येष्ठ दशावतारी कलाकार कै. बाबी लातये, कै. बाळकृष्ण गावडे तसेच सुयोग मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर उर्फ पप्पू मुळीक यांच्या आग्रहामुळे मी या क्षेत्रात प्रवेश केला. बाबल नाईक व संजय जोशी हे माझे दशावतार कलेतील पहिले गुरु आहेत. पुढे विविध नाट्यमंडळांत काम करत असताना प्रत्येक लहान मोठ्या कलाकाराकडून सातत्याने शिकत गेलो. तसेच या क्षेत्रात4 काम करताना बाबी कलिंगण, बाबी वेतोरकर, विलास तेंडोलकर, बाळू मांजरेकर आणि विठ्ठल कळणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मला प्राप्त झाला,” असे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले. या पुरस्कारामुळे मळगाव परिसरासह संपूर्ण दशावतार कला क्षेत्रात रमेश शिरोडकर यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











