
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा-रुपाचे चाळ येथील शेतजमिनीत बेकायदेशीर खनिज मातीचा उपसा आणि भराव केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला असून बेकायदेशीरपण खनिज माती टाकून सरकारी जमीनीची रॉयल्टी थकविल्याबाबत व शेतजमीन नापिक केल्याबाबत तहसीलदारांकडे हेमंत नाईक, अभिजीत भगत यांनी तक्रार केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जमिनीमधील आपल्या बागायतांमध्ये गेल्या महिन्यात अंदाजे ४० डंपर खनिज माती टाकली आहे. गेल्या वर्षी पाऊस झाल्यामुळे खनिज माती टाकून पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पारंपारीक मार्ग बंद केल्यामुळे आमच्या शेतजमिनीत पाणी साचून आमच्या शेतीचे नुकसान झाले. तसेच सदरच्या साचलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या जीवोतास धोका निर्माण झाला. त्यामुळे आम्ही ३० शेतकऱ्यांनी आरोंदा ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी लेखी मागणी केलो होती.
या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून यंदाच्या पावसाळ्यात शेतीसह मानवी जीवनास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खनीज माती किती आहे याची खातरजमा करावी व सरकारची रॉयल्टी थकविल्याबद्दल त्यांचेवर दंड आकारावा तसेच आमच्या शेतमिनीतील पाण्याचा मार्ग मोकळा करुन देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.










