दयासागर छात्रालयात शिवकालीन साधनांचे प्रदर्शन

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचं आयोजन
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 16:50 PM
views 12  views

सावंतवाडी :  दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने, रोणापाल दयासागर छात्रालय व व्यवस्थापक जिवबा  वीर यांच्या  सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी खास "शिवकालीन साधन (शस्त्रांची)  व इतिहासाची  प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी  एकदिवसीय शिवकालीन साधनांचे प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी यांनी आतापर्यंत ८० शाळ्यांच्या आसपास शालेय विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने  शालेय पुस्तकी ज्ञानाबरोबरच शिवकालीन साधनांची प्रत्यक्ष माहिती देत इतिहासाविषयी गोडी निर्माण करत आहेत त्याचप्रमाणे दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे, शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष जाणीव व्हावी या मुख्य उद्देशाने हा उपक्रम ते राबवित आहेत.  प्रदर्शनात मराठा शस्त्रागारातील शस्त्र ,मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार ,बिचवा, वाघनखे, खंडा तरवार, नागीन तरवार, ढाल, जिरेटोप, तोफ  यांच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ ,भीतपत्रक,मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष  आकर्षण ठरले. 

प्रदर्शनात ज्ञानेश्वर राणे ,रितेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवकार्याचे महत्त्व ,विविध गड किल्ल्यांची माहिती देत शिवकालीन साधनांची प्रात्यक्षिक  करून माहिती दिली. यावेळी मुलांनी प्रत्यक्षरित्या शिवकालीन शस्त्रे हाताळली. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने रोणापाल दयासागर छात्रालयात उपक्रमपर प्रदर्शन राबविण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , खाऊचेही वाटप करण्यात आले.

यावेळी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर यांनी विशेष कौतुक करत त्यांच्या कार्याबद्दल आभार  व्यक्त केले. तसेच छात्रालयाच्या रत्नप्रभा केळुसकर यांनी सुद्धा राणे यांच्या टीमचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर राणे ,आबा चिपकर,नारायण गडेकर ,भूषण मांजरेकर अमेय गावडे, रितेश राऊळ,पत्रकार मंगल कामत,मदन मुरकर उपस्थित होते.छात्रालयाच्या रत्नप्रभा केळुसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.