सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी खासदार श्रीकांत शिंदेंच वेधलं लक्ष

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 16:25 PM
views 61  views

सावंतवाडी : कल्याण-उल्हासनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे सकारात्मक लक्ष दिले असून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे प्रलंबित प्रश्न आणि महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या थांब्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'खासदार आपल्या भेटीला' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई समन्वयक दर्शन विठ्ठल नाईक यांनी खासदारांची भेट घेऊन सावंतवाडी परिसराशी संबंधित रेल्वे प्रश्नांचे सविस्तर निवेदन सादर केले. सावंतवाडी टर्मिनस येथे मंगळूर एक्सप्रेसला अधिकृत थांबा मिळावा. कोविड-१९ काळात रद्द करण्यात आलेले गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१) आणि राजधानी एक्सप्रेसचे पूर्वीचे थांबे पुन्हा सुरू करण्यात यावेत. सावंतवाडी टर्मिनस येथील अपूर्ण राहिलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत म्हणून खासदार डॉ. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन स्वीकारून या सर्व मागण्यांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्याचे डॉ. शिंदे यांनी मान्य केले आहे. सावंतवाडीकरांना लवकरच रेल्वेच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.