
कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे भव्य 'तिरंगी डबलबारी' भजनाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता, कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी मांडकुलीतील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी नाईक यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, डबलबारीतील भजनी बुवांनी आमदार नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित खास गीते सादर करत त्यांना सांगीतिक शुभेच्छा दिल्या, ज्याने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
केवळ वाढदिवस साजरा न करता सामाजिक कृतज्ञता जपण्याचे कामही यावेळी करण्यात आले. मांडकुली गावात गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा देणारे डॉ. दामले, डॉ. ढवण आणि डॉ. नाईक यांचा यावेळी विशेष सत्कार करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच तुषार सामंत उपस्थित होते.
तसेच उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, कपिल म्हापसेकर, युवासेना शाखा प्रमुख सिद्धेश धुरी, तातू मुळीक, अभिषेक मराठे, राजेश सावंत, धनवान खवणेकर, संतोष पेडणेकर, गौरव पेडणेकर, गोविंद अनसुरकर, चेतन मुळीक, सत्यवान मुळीक, महादेव मुळीक, शिवाजी मुळीक, संदीप नेमळेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










