खरात प्रकरणी केसरकरांवर उबाठा शिवसेनेचे आरोप

उद्या प्रांताधिकाऱ्यांना देणार निवेदन
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 14:12 PM
views 131  views

सावंतवाडी : भोंदू बाबा अशोक खरात सोबत माजी मंत्री, दीपक केसरकर यांचे नेमके संबंध काय  आहेत ? याची सखोल चौकशी झाली पाहीजे. सत्तेतील सहभागी असलेले ९ मंत्री यात असून आम. केसरकर यांचीही बाजू विसंगत वाटत आहे. यामुळे रामराज्य असणाऱ्या सावंतवाडीच नाव खराब होत आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांना वंदन करून केसरकरांची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी करणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी सांगितले.  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उबाठा शिवसेना रमेश गावकर, राजू शेटकर, रमेश सावंत, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते. श्री. कासार म्हणाले, केसरकरांनी विकासकामांवर लक्ष न देता केवळ निवडणूक आली की भोंदूगिरी आणि बुवाबाजीचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल करायच काम केलं. खरात सोबतही त्यांचे फोटो असून इतरांचा खुलासा व केसरकरांचा खुलासा विसंगत वाटत आहे. त्यामुळे खरातसह भोंदू बाबांसोबत त्यांचे असलेले नेमके संबंध काय ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सत्तेत सहभागी असलेले ९ मंत्री यात सामील असल्याचे बोलले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही फोटो खरात सोबत आहे. गुवाहाटीला एकनाथ शिंदेंना घेऊन जाण्यात खरातकडे घेऊन जाण्यात केसरकर असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, आम्ही कोणत्याही प्रकारच्या भोंदूगिरीला मानत नाही. मात्र, स्त्रीयांच झालेलं शोषण व इतर प्रकार हे घातक आहे. या प्रकरणाचा तपास जर योग्य रितीने सुरू राहिला, तर अनेक बड्या लोकांची नावे समोर येतील अशी माहिती त्यांनी दिली. तर उबाठा शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या खरात सोबत असलेल्या फोटो बाबत विचारलं असतं यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सावंतवाडीचे मतदार असून केसरकरांमुळे सावंतवाडीच नाव‌ खराब होत असल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.