अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवल्याबद्दल पत्रकार सीताराम गावडेंचा सत्कार

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 21, 2026 20:21 PM
views 16  views

सावंतवाडी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजातील अन्याय, अमली पदार्थांचा विळखा आणि अवैध धंद्यांविरोधात ठामपणे आवाज उठवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार तथा सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन झालेला हा सन्मान सडेतोड पत्रकारितेच्या लढ्याला दिलेली दाद होती.

गावडे यांनी अमली पदार्थ माफिया, अवैध धंदे आणि समाज पोखरणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उघडपणे रणशिंग फुंकले आहे. याच धाडसी भूमिकेची दखल घेत मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, सल्लागार यशवंत देसाई, दिलीप पवार, अरुण घाडी, रवी जाधव, महादेव राऊळ, मनोज घाटकर, माजी नगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगांवकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणजे दुःख अडवणारा उंबरठा आणि वणव्यातील गारवा आहेत अशा शब्दांत सत्काराला उत्तर देताना गावडे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी कामाचे कौतुक केले. हा सत्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही तर अन्यायाविरोधात उभं राहण्याच्या धैर्याचा सन्मान असल्याचे उद्गार त्यांनी काढले. सावंतवाडी आणि सिंधुदुर्गात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात आता अशीच ठाम भूमिका घेणारे हात पुढे आले, तरच समाज सुरक्षित राहणार असंही मत त्यांनी व्यक्त केले.