असिम सरोदेंचे आरोप खोडसाळ, राजकीय आकसापोटी !

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या किशोर वरकांची पाठराखण | सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे प्रत्युत्तर
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 17, 2026 14:07 PM
views 337  views

सावंतवाडी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडीत आलेल्या ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी बार असोसिएशन आणि जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी केली आहे. सरोदे यांचा हा खटाटोप केवळ जिल्ह्यातील सर्वसंमतीच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी असल्याचा दावाही  यावेळी करण्यात आला. तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ॲड. वरकांची पाठराखण  ते करत असल्याचे मत व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बालाजी रणशूर, जेष्ठ विधिज्ञ संदिप निंबाळकर, ॲड. श्यामराव सावंत,  ॲड. अमोल कविटकर, ॲड. गोविंद बांदेकर, ॲड. संकेत नेवगी, ॲड. राहूल मडगांवकर, ॲड. स्वप्नील कोरगांवकर, ॲड. सुशील राजगे, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. सुमित सुकी, ॲड. प्रतिक्षा भिसे, ॲड. सिद्धी परब आदी उपस्थित होते.

ॲड‌. नाईक म्हणाले, ॲड. किशोर वरक यांनी ॲड. असीम सरोदे आणि निवृत्त न्यायमूर्ती नलावडे यांचे 'मतदारांची भूमिका' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यासाठी सावंतवाडी बार असोसिएशनकडे तोंडी परवानगी मागितली होती. मात्र, बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचा कोणताही निर्णय होण्यापूर्वीच ॲड. वरक यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्ध केली. सरोदे यांनी यापूर्वी बार्शी आणि सांगली येथे अशाच व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यमान बार कौन्सिल सदस्यांवर तथ्यहीन टीका केली होती. त्यांचा मूळ हेतू प्रबोधन नसून निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करणे हा असल्याचे लक्षात आल्यावर, बार रूममध्ये अशा कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. २४ मार्च रोजी निवडणूक झाल्यानंतर हे व्याख्यान घेण्याची तयारी अध्यक्षांनी दर्शविली होती‌. मात्र, तरीही सरोदे यांनी परवानगीशिवाय व्याख्यान घेण्याचा हट्ट धरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ॲड. असीम सरोदे हे ज्या ॲड. किशोर वरक यांची पाठराखण करत आहेत, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे प्रलंबित असल्याचे बार असोसिएशनने निदर्शनास आणून दिले आहे. तर खंडणीच्या प्रकरणात उच्च न्यायालय (सर्किट बेंच कोल्हापूर) आणि सर्वोच्च न्यायालयानेही वरक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीला सोबत घेऊन सरोदे हे जिल्ह्यातील वकिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ॲड. परिमल नाईक यांनी केला आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या उभारणीत ॲड. संग्राम देसाई यांचे योगदान नसल्याचे विधान सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केले होते. याला प्रत्युत्तर देताना नाईक म्हणाले की, "सर्किट बेंच ही गेल्या ४० वर्षांच्या संघर्षाचे आणि सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या एकजुटीचे फळ आहे. निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महत्वपूर्ण योगदानासह महाराष्ट्र बार कौन्सिलने समन्वयक म्हणून नियुक्त केलेले अड. संग्राम देसाई यांनी शासन आणि न्यायालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. खुद्द उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देसाई यांच्या कार्याचा गौरव केला आहे, ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी काहीही केले नाही असे म्हणणे की धादांत खोटी टीका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. असीम सरोदे यांनी बार असोसिएशनला कोणतेही लेखी पत्र दिले नसतानाही खोटे विधान केले आहे. केवळ वैयक्तिक आकसापोटी आणि निवडणुकीच्या राजकारणामुळे ते जिल्ह्याच्या वकीलांची प्रतिमा मलिन करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील सुज्ञ मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत आणि ॲड. संग्राम देसाई यांच्या कार्याची पावती त्यांना निवडणुकीत निश्चित मिळेल, असा विश्वास ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रणशूर यांनीही ॲड. असिम सरोदे यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला आपल्या समितीने परवानगी दिलेली नव्हती असे स्पष्ट केले. तसेच ते न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर समितीने किंवा कोणत्याही सदस्याने त्यांच्या न्यायालयातील कार्यक्रमाला अटकाव देखील केला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वकील संघटनेवर त्यांनी केलेले आरोप अत्यंत खोडसाळ असल्याचे ते म्हणाले.तर सामाजिक चळवळीत आपण ॲड. सरोदे यांच्यासोबत असलो तरीही किशोर वरक यांच्यासारख्या गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन त्यांनी काम करू नये असे आपण त्यांना सुचवले होते. मात्र त्यांनी ते जुमानले नाही. या निवडणुकीत कोणासोबत रहावे आपला वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे आपण पलटी घेतली हा सरोदे यांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचे यावेळी ॲड. संदीप निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी वकील संघटनेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.