शिवसेना महिला आघाडीच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 09, 2026 19:51 PM
views 8  views

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजातील महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. भक्ती सावंत उपस्थित होत्या. या सोहळ्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला रिक्षाचालक म्हणून ओळख असलेल्या प्रज्ञा पांचाळ यांचा करण्यात आला. त्याचप्रमाणे शंभरहून अधिक गडकिल्ले सर करणारी साहसी महिला नुपूर अक्षय मठकर हिच्या धाडसाचेही यावेळी कौतुक करण्यात आले. कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुणाल गाड यांच्या मातोश्री सौ. संतोषी गाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, सावंतवाडी स्मशानभूमीत आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रेतदहनाचे कठीण कार्य करणाऱ्या सौ. सुजल निरवडेकर यांचाही सत्कार करून त्यांच्या जिद्दीला दाद देण्यात आली. या कार्यक्रमात एकूण १५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. 

समाजातील महिलांनी केलेल्या अशा वेगळ्या आणि कष्टप्रद कार्यामुळे इतर महिलांनाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा गौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अ‍ॅड. निता सावंत, नवनिर्वाचित नगरसेविका शर्वरी धारगळकर दुभाषी, स्नेहा नाईक, ॲड सायली दुभाषी, उत्कर्षा सासोलकर, पूजा सोन्सुरकर, सुप्रिता धारणकर, सुलोचना गावडे आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.