
कृष्णा ढोलम, मालवण
मालवण शहरात असलेल्या मेढा परिसरात शिवकालीन इतिहासाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. राजा कर्नगिरी स्वामी महाराज यांच्या समाधीवर शिवकालीन शिवपिंडी असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यापूर्वीच या ठिकाणी घुमटी बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरातील आणि ही शिवपिंडी एकसारखीच असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लक्षात घेता या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे आवश्यक आहे.
मालवण मेढा येथे शिवकालीन घुमटी असल्याचे समोर आले आहे. या घुमटीत शिवपिंडी असून इथे राजा कर्नगिरी स्वामी महाराज यांनी समाधी घेतल्याचे सांगितले जात आहे. राजा कर्नगिरी महाराज स्वामी हे अनेक वर्षे कुरटे बेटावर दगडी चौरंगावर बसून तपश्चर्या करत असत. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसरात तटबंदी उभारण्याचा निर्णय घेतला. स्वामींना देखील तशी कल्पना दिली. त्यावेळी स्वामींनी आपण इथे समाधी घेणार असल्याचे महाराजांना सांगितले. जर येथे तटबंदी बांधली जाणार असेल तर समाधीसाठी स्वतंत्र एकांतात जागा उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर समुद्रालगत असलेली मालवण मेढा येथील जागा समाधीसाठी निवडण्यात आली. मालवण पोलीस स्थानकाचे बहूउद्देशिय सभागृह आहे त्याच्या जरा पुढे ही घुमटी आहे. त्या काळात येथील परिसर पूर्णपणे जंगली होता. त्यावेळी घरे वैगरे नसल्याने ती जागा निश्चित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तिथे येऊन स्वामींना दूध पाजायचे. या ठिकाणाहून एक गुहा देखील गेल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. जागा निश्चित झाल्यानंतर राजा कर्नगिरी स्वामी महाराज यांनी येथे समाधी घेतली. या ठिकाणी असलेली घुमटी ही अतिशय पुरातन वास्तू मानली जाते. या घुमटीतील शिवपिंडी कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरातील शिवपिंडीसारखीच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेले कमंडलू आजही तेच आहे. घुमटी, शिवपिंडी आणि कमंडलु यात कोणीही बदल केला नाही. घुमटी समोर एक तुळस असून ती सुद्धा त्याचवेळी बांधण्यात आली आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याआधी ही घुमटी बांधण्यात आली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्याची उभारणी करण्यात आली. ही घुमटी असलेली जागा करवीर संस्थानच्या मालकीची असल्याची माहितीही पुढे येत आहे. सध्या या ठिकाणी स्थानिक नागरिक कुलदीपक उर्फ बाळा जनार्दन मुळेकर व त्यांचे कुटुंबीय – कल्पिता कुलदीपक मुळेकर, सहयोग कुलदीपक मुळेकर आणि योगीराज चंद्रशेखर मुळेकर – नियमित पूजा-अर्चा करीत आहेत. आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण सेवा करत राहणार आहे. मात्र, या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूचे जतन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
येथे एक राखणदार असून सर्वांच्या हाकेला धावून येतो. मला महाराजांनी अनेकवेळा दृष्टांत दिला असून काहीवेळा मी दिवाबत्ती लावली नाही तर दिवा पेटत असतो. लहान वस्त्र नेसून स्वामी चौरंगावर बसलेले दिसतात. ही जिवंत समाधी असून हाकेला धावते. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेले कमंडलु चोरी झालेले. मात्र, कदाचित त्याचा त्याला त्रास झाला असेल म्हणून त्याने ते पुन्हा तिथे लावल्याचे बाळा मुळेकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मेढा येथे ही वास्तू उभारलेली आहे. खाली समाधी आहे आणि त्यावर पिंडी आहे. मला हे समजताच शोध घेत आलो. येथील नागरिक बाळा मुळेकर यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली. समाधी आणि त्यावर पिंडी याचे आश्चर्य वाटले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ही वास्तू आहे. त्यामुळे मालवण वासियांनी देखील या वास्तूचे जतन करण्यासाठी पुढे यावे हीच अपेक्षा.
राजन भोजणे, नागरिक
मालवण ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. एवढी वर्षे मी इकडे येतो पण या घुमटी बद्दल माहिती नव्हती. घुमटी पहिल्यानंतर मी तेथील नागरिक बाळा मुळेकर यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. महाराजांच्या वास्तूचा प्रसार व्हावा आणि त्याचे जतन व्हावे.
प्रदीप मयेकर, नागरिक
या वास्तूला भेट दिल्यानंतर एक नवचैतन्य असल्यासारखे वाटले. महाराजांची वास्तू मेढा येथे आहे ही मालवण वासियांसाठी पर्वणीच आहे. कर्नगिरी महाराज येथे वास्तव्यास होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधीसाठी स्वामींना जागा दिली. महाराजांनी उभारलेल्या वास्तूचे जतन व्हावे. ही वास्तू जगभर पोहोचावी हीच इच्छा आहे. एवढी वर्षे इथे राहून आम्हाला सुद्धा या वास्तुबद्दल माहिती नव्हती. सर्व मालवण वासियांनी एकत्र येऊन वास्तूचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विश्वास गांवकर, नागरिक











