
कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षदा वाळके व उपसभापतीपदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी ही निवड जाहीर केली आहे. नांदगाव गावाला हर्षदा वाळके यांच्या रुपाने सभापतीपदाची संधी मिळाली तर वरवडे गावाला उपसभापतीपदाचा मान सोनू सावंत यांच्या रुपाने मिळाला आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये १६ सदस्य असून सर्वच्या सर्व भाजप व शिवसेना महायुतीचे निवडून आले आहेत. सोमवारी सभापतीपदासाठी हर्षदा वाळके, उपसभापतीपदासाठी सोनू सावंत यांच्या नावावर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर सभापती, उपसभापतीपदासाठी निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्यात आली. यात सभापतीपदी हर्षदा वाळके तर उपसभापतीपदी सोनू सावंत यांची यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या निवडीनंतर भाजपाचे झेंडे व फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात पंचायत समितीचा परिसर निनादून गेला होता. यावेळी नांदगाव,असलदे, आयनल, कोळोशी , तोंडवली , बावशी तसेच वरवडे , कलमठ , आशिये , पिसेकामते व तालुक्यातील अनेक ग्रामस्थ कणकवली येथे हर्षदा वाळके व सोनू सावंत याना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी उपसभापती महेश गुरव , संतोष कानडे, पंचायत समिती सदस्या दिव्या पेडणेकर, बबलू सावंत, राजू रावराणे , समीर प्रभुगांवकर , जि.प. सदस्या प्राची इस्वलकर , बँक संचालक समीर सावंत, सुशील सावंत ,माजी सभापती प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, लोरे सरपंच अजय रावराणे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब , पंढरी वायंगणकर , आयनल सरपंच श्रीमती दहिबांवकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर , दामू सावंत , सुशील इंदप , कमलेश पाटील , माजी सरपंच संजय पाटील आदींसह सर्वही पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात विकासात्मक काम करणार : हर्षदा वाळके
कणकवली तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून मला काम करण्याची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व भाजपा नेते व पदाधिकाºयांनी माझ्यावर देत दाखविलेला विश्वास सार्थकी लावणार आहे. सर्व सहकाºयांना विश्वासात घेऊन कणकवली तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. प्लास्टिकचा जो भस्मासुर, भूजलाचे कमी झालेले प्रमाण , महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा यादृष्टीने जे वेगवेगळे कायदे आहेत आणि त्या कायद्यांच्या समिती आहेत त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल या दृष्टीने निश्चितपणे माझा प्रयत्न राहणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना पुढील काळात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया हर्षदा वाळके यांनी दिली.
संधीचे सोने करणार : सोनू सावंत
उपसभापती सोनू सावंत म्हणाले, उपसभापती पदाची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे ,पालकमंत्री नितेश राणे ,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे मिळाली. या संधीचे मी नक्कीच सोनं करेन आणि पालकमंत्री नितेश राणे यांना अपेक्षित असलेले काम उभं करणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पुढील काळात काम केले जाईल.











