
सावंतवाडी : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६' चा सोहळा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे उत्साहात पार पडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शेर्ले सरपंच प्रांजल जाधव यांनाही गौरविण्यात आले.
या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा मनिषा लोहार, समारंभाध्यक्षा सौ. स्नेहा फणसळकर तसेच प्रमुख मान्यवर म्हणून साधना पाटील, सुजाता पेंडसे, सौ. अंजली नांगरे आणि मृणालिनी मोहिते आदी उपस्थित होत्या. पुरस्कार प्रदान करताना संस्थेच्या वतीने भावना व्यक्त करण्यात आल्या. संबंधित महिलांनी आपल्या अथक परिश्रमातून आणि उच्च वैचारिक भूमिकेतून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या गतिमान आणि चौफेर कार्याची दखल घेत हे 'गौरवरूपी पुष्प' त्यांना बहाल करण्यात येत आहे. भविष्यातही त्यांच्याकडून आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ विधायक कार्य घडत राहील, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन प्रगतीची घौडदौड सुरू ठेवणारी ही व्यक्तिमत्त्वे भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील," असे गौरवौद्गार यावेळी काढण्यात आले. उपस्थितांनी या नवदुर्गांच्या उज्ज्वल आणि दमदार वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.











