
सावंतवाडी : राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवार ९ मार्च २०२६ रोजी आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महा ई सेवा व आधार सेवा केंद्र धारक शासनाच्या विविध डिजिटल सेवांद्वारे नागरिकांना सेवा पुरवत असून त्यामुळे शासनाची कार्यक्षमता वाढली आहे. नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाचत आहे तसेच शासनाची आर्थिक बचतही होत आहे. या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यरत केंद्र चालकांना थकीत कमिशन, वारंवार नियमबदल, कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करण्याची कारवाई, मासिक मानधन व सामाजिक सुरक्षेचा अभाव अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये नवीन महा ई सेवा केंद्रांना स्थगिती देणे, आधार सेवांचे थकीत कमिशन तात्काळ अदा करणे, ५० हजार रुपयांची डिपॉझिट रक्कम परत करणे, कमिशन वेळेवर थेट खात्यात जमा करणे,
लोकसंख्येनुसारच केंद्रांची संख्या निश्चित करणे, विविध सरकारी योजनांचे प्रलंबित कमिशन अदा करणे, केंद्र चालकांना मानधन व विमा संरक्षण देणे, शासन समितीत संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करणे, तसेच कोणतेही केंद्र बंद करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात 2024 मध्ये केंद्र वाटपाबाबत चौकशी करण्याची मागणी तसेच आधार नोंदीतील नाव, जन्मतारीख व विवाह प्रमाणपत्रातील QR कोड संदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार निवेदने व न्यायालयीन याचिका दाखल करूनही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. निवेदन देताना सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खरात, राज्य प्रतिनिधी संदेश कल्याणकर, सावंतवाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद नाईक, सावंतवाडी खजिनदार सीमा मठकर, सल्लागार सुशिल आमोणेकर, कणकवली तालुका सल्लागार व कडावल केंद्र चालक विलास परब पदाधिकारी उपस्थित होते.










