
जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
सावंतवाडी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमातील यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण आणि सन २०२५-२६ च्या नवीन तुकड्यांचे उद्घाटन सोहळा रविवारी जागतिक महिला दिनी ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून 'महिला सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल' या संकल्पनेतून हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११.०० वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अटल प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच एस. पी. के. कॉलेजचे प्राचार्य दिलीप लक्ष्मण भारमल, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, माजी सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख आणि मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास राबते यांचीही विशेष उपस्थिती असेल. प्रमाणपत्र वितरणासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे आणि त्यांच्या कौशल्यांना वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे एस. एस. आय. कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे आणि डॉ. सौ. गौरी तानावडे यांनी सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आणि प्रशिक्षणार्थींनी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










