
सावंतवाडी : आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला. या निमित्ताने दाणोली नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

आंबोली-बेळगाव मार्गालगत असलेल्या साटम महाराजांच्या समाधी स्थळी आणि त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावर्षीही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भक्तांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या उत्सवानिमित्त दिवसभर मंदिरात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसादाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री पालखी प्रदक्षिणा आणि इतर कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता झाली.










