सावंतवाडीत ग्राम महसूल अधिकाऱ्यावर लाच प्रकरणी गुन्हा

एक हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Edited by: रविंद्र जाधव
Published on: February 28, 2026 23:44 PM
views 16  views

सिंधुदुर्ग :  अँटी करप्शन ब्युरोच्या सिंधुदुर्ग युनिटने सावंतवाडी तालुक्यातील तलाठी सजा निरवडे येथील ग्राम महसूल अधिकारी प्रवीण दिलीप पोले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अन्वये सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार (वय ४२) यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित काम मार्गी लावण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने २,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. तडजोडीनंतर १,००० रुपये स्वीकारण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने ३० डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग (कुडाळ) येथे तक्रार दिली होती. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तलाठी पोले यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने केली आहे.दरम्यान, शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.