विश्‍वास पर्वाची तपपूर्ती !

Edited by:
Published on: February 28, 2026 23:34 PM
views 17  views

विशेष संपादकीय | संदीप देसाई, संपादक, कोकणसाद LIVE - दैनिक कोकणसाद

कोकणच्या लाल मातीत रुजलेलं आणि कोकणवासीयांच्या अतूट विश्वासानं वाढलेलं ‘कोकणसाद LIVE’ चॅनल आज १२ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. हा केवळ एका मीडिया संस्थेचा प्रवास नाही; हा कोकणातील सामान्य माणसाच्या आशा-अपेक्षांचा, न्यायासाठीच्या लढ्याचा आणि विश्वासाच्या नात्याचा प्रवास आहे.

ज्या काळात कोकणात स्मार्टफोन दुर्मिळ होते, सोशल मीडियाची चाहूल नुकतीच लागली होती, त्यावेळी एका छोट्याशा रोपट्याप्रमाणे ‘कोकणसाद LIVE’ ची सुरुवात झाली. आज त्याच रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालं आहे. या वटवृक्षाच्या प्रत्येक फांदीला कोकणवासीयांच्या विश्वासाची, प्रेमाची आणि पाठिंब्याची जोड आहे. त्यामुळेच आज बातमी आणि विश्वासार्हता यांचं समीकरण म्हणजे ‘कोकणसाद LIVE’ असं अभिमानाने म्हणता येतं.

गेल्या बारा वर्षांत आम्ही अनेक चढ-उतार पाहिले, आव्हानांना सामोरं गेलो, दबाव आणि आमिषांना न जुमानता सत्याचा मार्ग स्वीकारला आणि तो अविरत पुढे घेऊन जातो आहोत. “कशाला उद्याची बात... आता बातमी एका क्षणात!” असं दृढ दृढ निश्चय करून मीडिया क्षेत्रात पदार्पण केलेल्या कोकणसाद LIVE ने वेगाइतकाच  सत्य आणि निष्पक्षतेचा ध्यास जपलेला आहे.  प्रशासन किंवा राज्यकर्त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, तर त्यांचा आवाज बनणं ही आमची जबाबदारी मानून आम्ही सातत्याने पार पाडली. म्हणूनच आज ‘कोकणसाद LIVE’  कोकणवासीयांचं हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील घराघरात आमचं नातं जोडलं गेलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील कोकणी माणसाशी आमची थेट कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. विशेषत: मुंबई, पुणे, गोवा येथील कोकणी चाकरमानी, देश विदेशातील लाखो दर्शक, चार लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सबस्क्रायबर्स, दीड लाखांहून अधिक फेसबुक फॉलोअर्स, ६० हजाराहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि ट्विटरवरील हजारो दर्शक हे आकडे फक्त संख्या नाहीत, तर हा आमच्यावर सामान्य माणसाने ठेवलेला विश्वास आहे.

बातम्यांपुरतंच मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणं हेही आमचं ध्येय राहिलंय. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि ‘युवा प्रेरणा’ सारख्या संकल्पनांद्वारे आम्ही नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतच आहोत. ‘स्मार्ट लीडर अवॉर्ड’ सारख्या उपक्रमांतून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करताना आम्हांला विशेष समाधान लाभतं. तर कोकणसाठी, येथील समाज आणि युवा पिढीच्या उज्‍ज्वल भवितव्यासाठी, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी अलौकिक कार्य करून योगदान देणाऱ्या रत्‍नांना शोधून त्यांना "कोकणरत्न" या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात टीम कोकणसाद नेहमीच पुढे राहिलीय. समाजातील चांगुलपणाला व्यासपीठ देणं, आणि त्यातून आदर्श समाज घडविणे हिच खरी पत्रकारितेची ताकद आहे.

आज १२ वर्षांची तपपूर्ती साजरी करताना आम्ही अधिक जबाबदारीची जाणीव बाळगतो. कारण जेव्हा एखादी संस्था “आपली” बनते, तेव्हा तिच्या प्रत्येक पावलाकडे अपेक्षेने पाहिलं जातं. त्या अपेक्षांना न्याय देणं हीच आमची पुढील वाटचाल असेल. कोकणची भूमी संत-विचारवंतांची, परंपरा आणि संस्कृतीची आहे. याचं कोकणच्या लाल मातीत पाय घट्ट रोवून ‘कोकणसाद LIVE’ चा प्रवास यापुढेही अखंड सुरू राहील. सत्य, वेग, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या चार स्तंभांवर उभं असलेलं हे कोकणवासियांचं हक्काचं व्यासपीठ भविष्यात अधिक सक्षम, अधिक व्यापक आणि अधिक प्रभावी होईल हा आमचा ठाम विश्वास आहे.

या १२ वर्षांच्या यशामागे जर कोणाचं खरं श्रेय असेल, तर ते फक्त आणि फक्त कोकणवासीयांचं आहे. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. आगामी काळातही आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी आणि तुमच्या हक्कांसाठी सदैव सज्ज आहोत.

कोकणसाद LIVE आवाज कोकणवासियांचा, प्रवास विश्वासाचा !