सुवर्ण विकासाचा ‘सुवर्णक्षण' !

'कोकणसाद LIVE’ च्या १२ व्‍या वर्धापनदिनी नितेश राणेंनी मांडला प्रगतीचा लेखाजोखा
Edited by: स्वप्नील परब
Published on: February 28, 2026 23:18 PM
views 20  views

सावंतवाडी : ‘सिंधुदुर्गचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून सातत्याने धावपळ केली आणि चिकाटी कधीही सोडली नाही. नेमके हेच गुण 'कोकणसाद'ने गेल्या १२ वर्षांत जपले आहेत. जिल्ह्याच्या विकासाचे प्रामाणिक प्रतिबिंब या माध्यमातून उमटत आहे," अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी 'कोकणसाद'च्या वाटचालीचे कौतुक केले. निमित्त होते १ मार्च ला होणाऱ्या 'कोकणसाद LIVE'च्या १२व्‍या वर्धापनदिनाचे, जिथे त्यांनी जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रातील एका नव्या क्रांतीची घोषणा केली. 

कोकणच्‍या लाल मातीतील अग्रगण्‍य चॅनेल ‘कोकणसाद LIVE’च्‍या १२व्‍या वर्धापनदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाला वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन संपादक संदीप देसाई व टीम कोकणसाद LIVE ला वर्धापनदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी त्यांचे समवेत युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सावंतवाडी नगरपरिषदचे सभापती सुधीर आरिवडेकर उपस्थित होते. ‘कोकणसाद LIVE’चे संपादक संदीप देसाई, मार्केटींग हेड समीर सावंत, चीफ रिपोर्टर कृष्‍णा ढोलम, सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी लवू म्‍हाडेेश्‍वर, वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब, दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब, वितरण प्रतिनिधी अशफाक शेख, उपसंपादक  स्‍वप्‍निल परब, जुईली पांगम, रवींद्र जाधव, भगवान शेलटे,  लक्ष्‍मण आडाव, प्रसाद कदम, विद्येश धुरी, ओंकार नाईक, अविनाश बांदेकर, रविकिरण राणे तसेच अन्‍य टीम उपस्‍थित होती. 

पुढे बोलताना नितेश राणे म्‍हणाले, १ मार्च हा दिवस सिंधुदुर्गच्या इतिहासात ऐतिहासिक ठरणार आहे. ३७ वर्षांपूर्वी कोकणात जलवाहतूक सुरू होती, ज्याच्या आठवणी आजही जुन्या पिढीच्या मनात ताज्या आहेत. आता तीच परंपरा आधुनिक स्वरूपात परत येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि महायुती सरकारच्या प्रयत्नांतून मुंबई ते विजयदुर्ग 'रो-रो' सेवा सुरू होत आहे. १ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता मुंबईच्या 'भाऊच्या धक्क्या'वरून ही बोट सुटेल आणि दुपारी १:०० वाजेच्या सुमारास ऐतिहासिक विजयदुर्ग बंदरात दाखल होईल. या सेवेमुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर पर्यटन, व्यापार आणि वाहतूक या तिन्ही क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. 

नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. ते म्हणाले की, "सिंधुदुर्गला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर करणे हे आमचे स्वप्न आहे. येथील तरुण-तरुणींना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, तर त्यांना आपल्याच जिल्ह्यात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे माझे मुख्य ध्येय आहे." "आज आपला जिल्हा निश्चितपणे बदलतोय आणि सक्षम होतोय. तरुण पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. कोकणच्या विकासाचा हा लेखाजोखा प्रत्येक वर्षी प्रगतीच्या एका नव्या पायरीवर असेल, असा विश्वास मी जिल्हावासीयांना देतो."

सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत राणे यांनी स्पष्ट केले की, सरकार म्हणून आम्ही पुढचे पाऊल टाकत आहोतच, पण जनतेनेही या विकासात आपला वाटा उचलावा. 'कोकणसाद'च्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रगतीचा आरसा समाजासमोर येत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.