
कणकवली : कणकवली शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात अनेक आरक्षणांमध्ये बदल झाला आहे. काही आरक्षणे रद्द झालीत, काही आरक्षणांमध्ये बदल झालाय. तर काही ठिकाणी नवीन आरक्षणे टाकण्यात आली आहेत. आम्ही या आरक्षणांचा अभ्यास करत आहोत. नागरिकांनीही हा आराखडा काळजीपूर्वक पहावा आणि आवश्यकता भासल्यास या आराखड्यावर सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री.पारकर म्हणाले, कणकवली शहराचा पहिला विकास आराखडा सन १९९९ पूर्वी तयार करण्यात आला. त्या आरखड्याची मुदत संपल्यानंतर आता नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक जमीन मालकांनी जुन्या विकास आराखड्यावर हरकती नोंदवल्या होत्या. परंतु त्या हरकतींना आता काहीही अर्थ नाही. तर नवीन विकास आराखड्यावर आवश्यकता भासल्यास हरकती घ्यावयाच्या आहेत. काही ठिकाणी चुकीचे आरक्षण असेल, किंवा काही प्रभागात नवीन रस्त्यांची आवश्यकता असेल तर त्याबाबतची सूचना किंवा हरकत नगररचना विभाग सिंधुदुर्ग किंवा नगरपंचायत कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावयाची आहे.
पारकर पुढे म्हणाले, शहराचा विकास आराखडा कालच प्रसिद्ध झालाय. या आराखड्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. जर शहरात आणखी सोयी, सुविधा निर्माण करायच्या असतील, तसेच काही विकासाच्या बाबी, नवीन विकास आराखड्यात समाविष्ट नसतील, तर त्याबाबत आम्ही ठराव करून तो नगरविकास विभागाकडे पाठविणार आहोत. तसेच आरक्षणामध्ये आवश्यकता बदल, नवीन आरक्षणे आदींबाबतही आम्ही निर्णय घेणार आहोत. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी विकास आराखडा पहावा आणि सूचना, हरकती नोंदवाव्यात, असेही पारकर म्हणाले.










