
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील शेकडो ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी व युवा वर्ग तसेच महिलावर्ग यांनी आपले नेते हे फक्त 'दीपक केसरकरच' असे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला.
यावेळी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, तालुका प्रमुख दिनेश गावडे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, गजानन नाटेकर, प्रमुख गावकर सोमनाथ राऊळ, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक देसाई, युवा नेते सूरज परब, उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रमुख गावकर सोमनाथ रामचंद्र राऊळ, बाबी राऊळ, बाळू गावडे आदींनी केले. यावेळी आ. केसरकर म्हणाले, वेर्ले गावासाठी आजपर्यंत ज्या काही मागण्या झाल्या त्या अधिकाधिक पूर्ण केलेल्या आहेत. आगामी काळातही गावात हायमास्ट तसेच रस्त्याची कामे व इतर रखडलेली कामे देखील पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार केसरकर यांनी नमूद केले. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत केले तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून वेर्ले पंचक्रोशीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी व प्रशासनाच्या दरबारी पाठपुरावा करत गावासाठी जे जे सहकार्य आहे ते शंभर टक्के करण्याची ग्वाही देत आपण सर्वांनी आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले.










