
सावंतवाडी : आमच्या पक्षात शिस्त आहे. पक्षानं दिलेला उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असो किंवा राजघराण्यातील, भाजपात शिस्तीला महत्व आहे. पक्षाचा शब्द खाली पडू दिला जात नाही. श्रद्धाराजे भोंसले या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत असे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जाहीर केले. आमचे उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे आहेत. विकासासाठी मेहनत घेणारे आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी आम्ही १५ जणांचे अर्ज दाखल केलेत. जगात, देशात, राज्यात आणि कोकणात भाजप नंबर वन होती, आहे अन् राहणार असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला. अनेक वर्ष विरोधी मंडळी सत्तेवर होती. आता माझ्या सारखा कार्यकर्त्याला व उमेदवारांना सावंतवाडीकर आशीर्वाद देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. ३ डिसेंबरला गुलाल हा भाजपचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडीचा विकास आणि शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही लढणार आहोत. हॉस्पिटल आणि रोजगाराचा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी भाजपची सत्ता असणं आवश्यक आहे. सावंतवाडीची जनता सुज्ञ, सुशिक्षित आहे. आमच्या उमेदवारांना जनता विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे उमेदवार सुज्ञ व सुशिक्षित आहेत. मी स्वतः घरोघरी जाणार असून लोकांना विनंती करणार आहोत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल असंही त्यांनी सांगितले. राणेंच्या टीकेबाबत विचारल असता ते म्हणाले, नारायण राणे वडीलधारी आहे. एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्याएवढा मी मोठा नाही. तुमच्या प्रश्नावर 'नो कमेंट्स' असं उत्तर श्री. परब यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, सौ. वेदीका परब आदी उपस्थित होते.










