
सावंतवाडी : रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात शहरातील नजीर शहा (वय ७०) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८ वाजता कोलगाव येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नजीर शहा हे सकाळी कोलगाव येथील रस्त्यावरून जात असताना खड्ड्यांमध्ये पडून त्यांना जबर मार लागला. या अपघातामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शहा हे सायकलपटू होते. दररोज ते सायकलिंग करत. आज खड्ड्यांमुळे त्यांना जीव गमवावा लागला.
सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी सांगितले की, आकेरीचा चढाव ते कोलगाव तिठ्या पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले आहेत, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
या जीवघेण्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी प्रशासनाला आणि संबंधित लोकप्रतिनिधींना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नगरपालिका निवडणूक संपताच ते याच रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन करतील. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे एका निरपराध वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. आता आणखी किती बळींची वाट पाहायची? असा सवाल केला आहे










