
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून नगरपरिषदेच्या १० प्रभागांमध्ये (वॉर्ड्स) एकूण २१ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांची यादी नगरपरिषदेने जाहीर केली आहे. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी देखील उमेदवारांनी पाठ फिरवली. महायुती व महाविकास आघाडीच काय ?याचाही स्पष्ट झालेलं नाही.
प्रभाग क्रमांक १ मध्ये वि. स. खांडेकर विद्यालयातील दोन वर्ग (इयत्ता ८ वी व १० वी), तर प्रभाग क्रमांक २ मध्ये कै. श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय (जि. प. शाळा नं. ६), मा. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी आणि जिमखाना समाजमंदिर बालावाडी इमारत या ठिकाणी प्रत्येकी एक केंद्र प्रस्तावित आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये काझी शाहबुद्दीन हॉलचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा क्र. ७ (३ री वर्ग) आणि सेंट्रल इंग्लिश स्कूल (नर्सरी वर्ग) येथे मतदान होणार आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये रघुनाथ मार्केट इमारत आणि शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल (ज्युनिअर के जी वर्ग) येथे दोन केंद्रे असणार आहेत. प्रभाग क्रमांक ६ साठी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या तळमजला हॉलचा पूर्व आणि पश्चिम भाग वापरला जाईल.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ (इयत्ता ५ वी वर्ग) आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा स्वस्थवृत्त विभाग ही दोन केंद्रे आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये मिलाग्रीस हायस्कूलचे दोन वर्ग (इयत्ता ९ वी 'अ' आणि 'ब') मतदान केंद्रासाठी निवडले आहेत.
प्रभाग क्रमांक ९ साठी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेज इमारतीमधील सेमीनार हॉलचा पूर्व व पश्चिम भाग, तर प्रभाग क्रमांक १० साठी टोपीवाला स्मारक तंत्रशाळेतील तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन क्लासरूम मतदान केंद्रे म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या २१ मतदान केंद्रांवर एकूण अंदाजे १९,६९५ मतदारांची नोंदणी आहे. प्रभाग ४ मधील ४/१ केंद्रामध्ये (जि. प. प्राथमिक शाळा क्र. ७) सर्वाधिक ११२९ मतदार असून, प्रभाग ९ मधील ९/१ केंद्रामध्ये (बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेज) सर्वात कमी ७०९ मतदार आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी सुरू केली असून, लवकरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. युती आघाडी तसेच राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त अपक्ष उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. एकीकडे, महायुती व महाविकास आघाडीची चर्चा सुरू असल्यामुळे उमेदवार त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तर युती किंवा आघाडी झाल्यास वा न झाल्यास बंडखोरी होऊन आपल्या गळाला कोणी लागतो का ? या प्रतीक्षेत अन्य पक्ष असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सकारात्मकता दिसून येत नाही आहे.










