
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग महाराष्ट्र प्रदेश कार्यालयास चित्रपट सेनेचे सचिन जुवाटकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भेटीदरम्यान जुवाटकर यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या कामाचे कौतुक करताना म्हणाले, "तुमच्या संघटनेचे काम अति उत्कृष्ट आहे. तुमच्या कामाची दखल श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचली असून, लवकरच तुमच्या संघटनेचा एक सत्कार करण्यात येईल." सर्व पदाधिकारी व सदस्य वेळात वेळ काढून उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात संघटनेचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. श्री. पारधी यांनी केलेल्या दोन महत्त्वपूर्ण कामांची दखल यावेळी घेण्यात आली. इन्सुली गावातील एक तरुण रागाने घर सोडून निघून गेला होता. सकाळपासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. श्री. ज्ञानेश्वर पारधी यांनी त्वरित प्रयत्न करून तो तरुण कोणत्या गाडीत बसला आहे, याचा क्रमांक मिळवला.
त्यांनी ड्रायव्हरला फोन केला असता, ड्रायव्हरने मुलाने कपडे बदलले असल्याने ओळखण्यास नकार दिला. पारधी यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवण्यास सांगितले. त्यावेळी तो तरुण एका कोपऱ्यात बसलेला दिसला. त्यांनी ड्रायव्हरला त्या तरुणाला अजिबात न सोडण्याची विनंती केली आणि त्याच्या मामाला सातारा टोलनाक्यावर बोलावून रात्रीचे दीड वाजता त्या तरुणाला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
एका व्यक्तीचे गाडीमध्ये सापडलेले पन्नास हजार रुपये श्री. पारधी यांनी त्याची ओळख पटवून प्रामाणिकपणे परत केले. या दोन्ही मानवतावादी व प्रामाणिक कार्याबद्दल श्री. ज्ञानेश्वर पारधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास राजे प्रतिष्ठानचे चित्रपट सेना सरचिटणीस श्री. सचिन जुवाटकर, किशोरराव राणे (विधानसभा संपर्क अध्यक्ष), महेश परब (तालुका अध्यक्ष), मिलिंद सावंत (शहर अध्यक्ष), राजू कासकर (जिल्हा अध्यक्ष), संतोष तळवणेकर (जिल्हा संपर्कप्रमुख), शिवा गावडे (खजिनदार), रमाकांत गावडे (सहसचिव), पूजा गावडे (महिला जिल्हाध्यक्षा), पूजा सोनसुरकर (जिल्हा महिला उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष वेंगुर्ला), संचिता गावडे (तालुका अध्यक्ष), दर्शना राणे (सचिव), सेजल पेडणेकर, प्रणिता सावंत, कल्पना सावंत, रूपाली रेडकर, अनिल सावंत, शरद सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव प्राध्यापक डॉक्टर रमाकांत गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपर्कप्रमुख शिवा गावडे यांनी केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग, सावंतवाडी येथील सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतला.










