अॅड. महेश राऊळ यांचा विशेष सन्मान सोहळा

जनहीत याचिका विनामूल्य लढली | शासकीय यंत्रणेला जाग आणली
Edited by: विनायक गांवस
Published on: October 26, 2025 14:58 PM
views 15  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत कारीवडे आणि समस्त कारीवडे ग्रामस्थ यांच्या वतीने, आरोग्य विषयक जनहीत याचिका विनामूल्य लढून शासकीय यंत्रणेला जाग आणणारे सुप्रसिद्ध वकील महेश राऊळ यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, सकाळी ठीक ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कारीवडे येथे हा सोहळा पार पडणार आहे.

कारीवडे गावातील आरोग्य विषयक सुधारणांसाठी गेले काही दिवस जो लढा सुरू आहे, त्याला कायदेशीर बळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वकील महेशजी राऊळ यांनी केले आहे. त्यांनी विनामूल्य जनहीत याचिका दाखल करून शासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

सरपंच, ग्रामपंचायत कारीवडे यांनी समस्त ग्रामस्थांना या सन्मान सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वकील महेशजी राऊळ यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या लढ्याला नैतिक पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.