तळवडेत दिवाळी प्रदर्शन - मेळाव्याला प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी घेतला वस्तू विक्रीचा अनुभव
Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2025 12:10 PM
views 44  views

सावंतवाडी : इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे दिवाळी प्रदर्शन व मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कमवा व शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतला वस्तू विक्रीचा अनुभव घेतला.  किल्ले बांधणी स्पर्धेलादेखील प्रतिसाद मिळाला.

गुरुवर्य बी एस नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे आयोजित दिवाळी प्रदर्शन व विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या प्रदर्शनात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कमवा व शिका या योजनेअंतर्गत कंदील पणत्या फराळ अशा अनेक वस्तूंची विक्री करून एक वेगळा अनुभव घेतला. पालक व ग्रामस्थांनी देखील वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व्ही बी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे खजिनदार सी एल नाईक, सदस्य सतीश बागवे, डॉ. नितीन सावंत, अमोल सावंत , छाया नाईक, प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, दिपावलीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शालेय किल्ले बांधणी स्पर्धेलादेखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारून दुर्ग संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी सहकार्य केले.