
सावंतवाडी : पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेची जाणीव करून देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सावंतवाडीसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.
सावंतवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात एकूण चार ठिकाणी (पोलीस ठाणे, आंबोली, सातार्डा व मळेवाड) ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांना ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस ठाणे ४० ज्येष्ठ नागरिक, मळेवाड ४० ज्येष्ठ नागरिक, आंबोली ३५ ज्येष्ठ नागरिक, सातार्डा २५ ज्येष्ठ नागरिक अशाप्रकारे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
या मेळाव्यादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी ज्येष्ठांसाठी उपलब्ध असणाऱ्या व्हाट्स ॲप चॅनेल 'समुद्र संदेश' आणि 'संवादातून आधार' या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच, सध्या वाढत असलेल्या फसवणुकीचे प्रकार टाळण्याबाबत आणि सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृती केली.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश केवळ ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे हा नव्हता, तर 'आम्ही आपल्यासोबत आहोत' याची त्यांना शाश्वती देणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढवणे हा होता. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलिस उप निरीक्षक जयेश खंदरकर आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.