
सावंतवाडी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी' यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी अंक प्रदर्शन आणि वाचक योजने'चा शुभारंभ आज शनिवारी सायंकाळी ग्रंथालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आणि संघाचे सहसचिव विनायक गांवस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना उद्घाटक सचिन रेडकर यांनी 'श्रीराम वाचन मंदिर'च्या उपक्रमांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा बहुमान दिल्याबद्दल आभार मानताना ते म्हणाले, लहानपणापासूनच मला वाचनाची आणि विशेषतः दिवाळी अंक वाचण्याची खूप आवड आहे. दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीचा ठेवाच असतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात 'श्रीराम वाचन मंदिर' वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जे स्तुत्य उपक्रम राबवत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. या सुंदर प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वांना वाचनाचा आनंद लुटता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विनायक गांवस यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना दिवाळी अंक वाचनाच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने 'श्रीराम वाचन मंदिर'ने सभासद आणि वाचकांसाठी 'दिवाळी अंक वाचक योजना' सुरु केली आहे. या योजने अंतर्गत वाचक अवघ्या रु. १०० वर्गणी आणि रु. १०० अनामत भरून १०० दिवसांच्या कालावधीत, म्हणजेच २० ऑक्टोबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत, १०० दिवाळी अंक घरी घेऊन वाचू शकणार आहेत. संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी या अनोख्या योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. स्वागत 'श्रीराम वाचन मंदिर'चे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी तर प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी केले. यावेळी सहकार्यवाह ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. अरूण पणदुरकर, बाळासाहेब बोर्डेकर, महेंद्र पटेल, निलिमा कानसे, गुरुप्रसाद वाडकर आदी उपस्थित होते.