
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन सावंतवाडी आयोजित कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील पतसंस्थांसाठी कुडाळ येथे व कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील पतसंस्थासाठी कणकवली येथे पदाधिकारी व व्यवस्थापक चर्चासत्र शिबिर नुकतेच पार पडले. कार्यक्रमांचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कणकवली सुनील मरभळ यांनी दिपप्रज्वलन करून केले. यावेळी व्यासपीठावर पतसंस्था फेडरेशनने अध्यक्षा सुनिल राऊळ, कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष व फेडरेशनचे संचालक बाबुराव कविटकर, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, भालचंद्र महाराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. ब्रम्हदंडे, रवळनाच पतसंस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ पावसकर व चौडेश्वरी संचालक विलास बुचडे, व फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार उपस्थित झाले.
सहकारी पतसंस्था या सर्वसामान्य, गरीब बेरोजगार लोकांसाठीची महत्वाची यंत्रणा आहे. तसेच तात्काळ सेवा पुरवणारी यंत्रणा आहे. यासाठी ती या पुढेही सक्षमपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे मत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुनील मरभळ यांनी मांडले. यासाठी संस्था सचिव, व संचालकांची बदलत्या निकषांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे, सचिवांची आपल्या संस्थाबाबत आत्मीयतेने काम करणे तसेच पतसंस्थेमुळे आपली ओळख निर्माण होते व समाजात पत वाढते याची जाण ठेवणे आवश्यक आहे. तसंच आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राबाबत अध्यावत ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आयोजित प्रशिक्षणामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकतो असे म्हणाले. तसेच पतसंस्था फेडरेशनचे सभासदत्त्व सर्व पतसंस्थानी स्वीकारण्याचे आवाहन केले.
पतसंस्था फेडरेशन हे पतसंस्थाचे हक्काचे व्यासपीठ असून हि सस्था जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना एकाच छताखाली आणण्याचे काम करत आहे. त्यासाठी सर्व तालुक्यामध्ये चर्चासत्र शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच पतसंस्थासमोरील समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध असल्याचे मत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी मांडले.
सिंधुदुर्गातील पतसंस्थांचे अधिवेशन मे २०२६ मध्ये आआंबोली येथे आयोजित करण्यात येणार आहे. हे अधिवेशन जिल्हा अध्नभांधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सर्व पतसंस्थांना एकाच व्यासपीठावर आणणे, त्याना भेडसावणाऱ्या समस्याबाबत विचारमंथन करणे, राष्ट्रीयकृत बँका वित्तीय संस्था व वित्तीय संस्था यांच्या स्पर्धेमध्ये व येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावीपणे काम करणे व संघटीत होऊन स्पर्धांना सामोरे जाणे, अशा व इतर अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांचे महाअधिवेशन मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक तालुक्यातील संघटना बांधणीची सुरुवात केली आहे, अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली आहे. तसेच या अधिवेशनासाठी सहकार खात्यातील राज्यस्तरीय व विभागस्तरीय वरिष्ठ अधिकारी तसेच व राज्य पतसंस्था फेडरेशन व विभागीय पतसंस्था फेडरेशनचे व अनेक जिल्ह्यांच्या फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थाच्या वसुलीसाठी, सक्षमीकरणसाठी अधिवेशनात अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच सहकारी पतसंस्था कर्मचारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी फेडरेशनतर्फे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
पतसंस्थांची वसुलीची समस्या सोडवण्यासाठी फेडरेशनकडून प्रभावी वसुली यंत्रणा राबवून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी फेडरेशनकडून वसुली अधिकारी नेमून पतसंस्थांची वसुली करण्यात येत आहे. यासाठी पतसंस्थांनी कायदा कलम १०१ ने दाखले मिळवून वसुलीसाठी पतसंस्था फेडरेशनकडे सादर करण्याचे आवाहन श्री. राऊळ यांनी केले आहे. पतसंस्थांच्या अडचणी दूर करण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही मत मांडले. तसेच जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचा एकमेकांशी सुसंवाद व्हावा व त्यांना मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांच्या समस्या जाणुन घेणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे दोन दिवसीय जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत असल्याचे सांगितले. याचबरोबर शासनाने दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पतसंस्थांसाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये सर्व पतसंस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणामध्ये सायबर क्राईम व वसुलीसारखे महत्वाचे विषय असल्याने पतसंस्थांना त्याचा अधिक उपयोग होणार असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पतसंस्था फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार यांनी केले. तर आभार प्रदर्शन पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणात पतसंस्था प्रतिनिधी उपलब्ध होते.