आरोग्य समस्यांवरून मनसेचा शिवसेनेला टोला

Edited by: विनायक गांवस
Published on: October 17, 2025 17:13 PM
views 19  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांविषयी जनतेला नितांत आदर आहे. प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर देत असलेल्या सेवेला सलाम आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, आजही गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी बांबोळी (गोवा) किंवा कोल्हापूर येथे पाठवावे लागते, असे मत मनसेचे शहराध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी व्यक्त करत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

ॲड. कासकर यांनी सवाल केला की, "रुग्णालयात अत्याधुनिक सोई-सुविधा नाहीत, याला जबाबदार कोण?" त्यांच्या मते, तीन टर्म आमदार आणि आठ वर्ष मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांचे हे स्पष्ट अपयश आहे. सेनेचे नेते लोबो यांनी केलेले 'डॉक्टरांची बदनामी'चे वक्तव्य हे जनतेची दिशाभूल करणारे व मूळ प्रश्नापासून भरकटवणारे आहे, असे कासकर म्हणाले. मुळात या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर आला तो मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे," असे अॅड. कासकर यांनी निदर्शनास आणले. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध नसल्याने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही रुग्णांवर उपचार करताना मर्यादा येतात.

अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना लढा देत आहेत. मात्र, या लढ्यात सामील होण्याऐवजी, मागील १५ वर्ष या मतदारसंघाचे आमदार व ८ वर्ष मंत्री राहिलेल्या दीपक केसरकर यांचे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेला मूळ प्रश्नापासून भरकटवत नेण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भलतेसलते आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे, असा थेट आरोप अॅड. कासकर यांनी यावेळी केला.