
सावंतवाडी : येथील मुख्य बाजारपेठेत पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेले खड्डे तसेच ठेवण्यात आल्याने व योग्य तऱ्हेने न बुजवल्याने रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून ऐन दिवाळीत सणासुदीच्या काळात ही विदारक परिस्थिती पाहून नगरपरिषद प्रशासन नेमकं करत काय? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बाजारपेठेत रोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल, दवाखाने, बँका इथे आहेत. या रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीनंतर हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवले गेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे. या खडीमुळे अनेक दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याची भीती आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या खड्यांचा आणि खडीचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच येथीलच एका खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सध्या नगरपरिषदेत मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज 'रामभरोसे' सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळेच बाजारपेठेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवावर बेतणारी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीसाठी खरेदी करण्याकरिता बाजारात येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालावावी लागत आहे.तात्काळ हे खड्डे बुजवून रस्त्यावरील खडी साफ करावी, अशी मागणी येथील नागरिक व व्यापारीवर्गाने केली आहे. अन्यथा, या दिवाळीत एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.